खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. ही मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येते. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले; आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.



.png)

0 Comments